राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सचिव पदी काझी खयामोद्दीन तर अंबाजोगाई शहर उपाध्यक्ष पदी विष्णू पांचाळ व वजीर शेख यांची नियुक्ती
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा , तालुका तसेच गाव पातळीवर पोचण्याची तयारी सुरू केली आहे. याच प्रक्रियेअंतर्गत माजीमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सचिवपदी काझी खयामोद्दीन यांची तर अंबाजोगाई शहर उपाध्यक्ष पदी भाई वजीर शेख तर विश्वकर्मा समाजाचे नेते विष्णू पांचाळ यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे नियूक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजकिशोर मोदी यांच्या हस्ते नुकतेच वितरित करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक मनोज लखेरा, महादेव आदमाने,कचरू सारडा ,खालेद चाऊस, सुनील वाघाळकर,गोविंद पोतंगले , सय्यद ताहेर ,खलील जाफरी आदीजण उपस्थित होते.
आगामी लोकसभा , विधानसभा तसेच नगरपालिका निवडणूका लक्षात घेऊन प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाची पक्षबांधणी वेगात सुरू झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोशल इंजिनिअरिंगचा ताळमेळ लावत बीड जिल्हा सचिव म्हणून काझी खयामोद्दीन तर अंबाजोगाई शहर उपाध्यक्ष म्हणून विष्णू पांचाळ व भाई वजीर शेख यांची निवड करण्यात आली आहे. काझी खयामोद्दीन व भाई वजीर शेख हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक सेवेत अग्रेसर आहेत. ते गरजू , निराधार व अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी देवरुपात धावून जातात.त्यांनी अनेक वृद्ध , विधवा तसेच निराधार वृद्धांना श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना ,आधार कार्ड , एसटी महामंडळाचे प्रवास सवलती चे कार्ड काढून दिली आहेत . अनेकांच्या बंद पडलेल्या पगारी पुन्हा चालू करून देऊन लोकांच्या मनात व घरात स्थान मिळवले आहे. तसेच विष्णू पांचाळ यांचे विश्वकर्मा समाजबांधवांसाठी केलेले सामाजिक कार्य व समाजासाठी त्यांनी दिलेले मोठे योगदान पाहून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंबाजोगाई शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या एकंदरीत सामाजिक कार्यावरून राज्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड राजेश्वर चव्हाण व राजकिशोर मोदी यांच्या हस्ते त्यांना निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. काझी खयामोद्दीन व भाई वजीर शेख तसेच विष्णू पांचाळ यांच्या निवडीचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे.तसेच यापुढेही त्यांच्याकडून असेच समाजकार्य घडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार सामान्यातील सामान्य नागरिकांपर्यंत पोचवावेत व माननीय खासदार शरदचंद्रजी पवार यांचे हात मजबूत करावेत अशी अपेक्षा देखील पक्षश्रेष्ठीकडून करण्यात आली आहे.